काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान केपी. शर्मा ओली यांनी पुन्हा एकदा राम मंदिर जन्मस्थान प्रकरणी वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. भगवान रामाचा जन्म नेपाळमधील माडी येथे झाला असल्याचे म्हणत ओली यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी स्थानिक नेत्यांना यासंदर्भातील योजना तयार करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले आहे.
अयोध्यापुरी हेच रामाचे जन्मस्थान आहे. येथे भव्य असे राम मंदिर बनवायला हवे. ओली यांनी माडीचे नाव अयोध्यापुरी करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सल्ल्यानुसार याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. अयोध्येपुरीचा ऐतिहासिक आणि धार्मिक क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी जमीन देण्याचे आश्वासनही ओली यांनी दिले आहे. त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती बनवण्यासही सांगितले आहे.
ओली यांच्या या निर्णयाला माडीवासीयांनी विरोध केल्याचे दिसत आहे. आधी पायाभूत सुविधांचा विकास करा, त्यानंतरच राम मंदिर बांधण्याचा विचार करा, असे स्थानिक चेपांग समुदायाने म्हटले आहे.
माडीमध्ये झाला भगवान रामाचा जन्म
चितवनच्या माडीमधील अधिका-यांना ओली यांनी शनिवारी फोन करुन बोलावले होते़ दोन तास चर्चा केल्यानंतर ओली यांनी अधिका-यांना राम मंदिर बनवण्यासंबंधी योजना तयार करण्यास सांगितले आहे. ओली यांनी रामाचा जन्म नेपाळमधील अयोध्यापुरी येथे झाल्याचा दावा केला आहे. शिवाय त्यांनी स्थानिक लोकांना ऐतिहासिक पुराव्यांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच अधिकचे पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्यापुरीमध्ये खोदकाम करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतात नकली अयोध्या असल्याचा दावा
भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करण्यासाठी नकली अयोध्येचे निर्माण केला असल्याचा दावा ओली यांनी मागील महिन्यात केला होता. नेपाळमध्ये खरी अयोध्या आहे. भारताची अयोध्या खरी असली तर राजकुमार लग्नासाठी जनकपुर येथे कसे येऊ शकतात. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती नेपाळमध्ये झाली आहे, असे ओली म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भारतीयांनी त्यांच्यावर टीका केली होती.
इंडो-इस्लामिक ट्रस्ट देणार योगींना आमंत्रण