मुंबई : मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असणारी बेस्ट बस तब्बल अडीच महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. सोमवारपासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्यांनाही बेस्ट बसने प्रवास करता येणार आहे. एका बसमध्ये फक्त ३० लोकांना प्रवासाची मुभा असून, फक्त पाच जणांना स्टँडिंगने प्रवासाची सूट देण्यात आली आहे. सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी बेस्ट बस धावणार असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमासह मास्क लावणे आणि हँडग्लोव्हज वापरणे प्रवाशांना बंधनकारक करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. परंतु आर्थिक गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी लाॅकडाऊनच्या नियमात शिथिलता आणली जात आहे. त्यामुळे सोमवारपासून दुकानांसह, ऑफिसेस उघडणार आहेत. तसेच इलेक्ट्रीशियन, सुतार अशांना काम करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. कामगार असो वा दुकानदार प्रत्येकाला आपल्या ऑफिस व घरी जाता यावे यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बसेस चालवण्यात येणार आहेत.
Read More …. तर गांजा लागवडीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल
एका बसमध्ये एका सीटवर फक्त एक प्रवासी व उभ्याने पाच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात स्वतःच्या मालकीच्या ३,३०० बसेस असून भाडेतत्वावरील ५६० बसेस आहेत. यापैकी सुरूवातीला अडीच हजार बसेस रोज धावणार असून गरजेनुसार अधिक बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जातील, असेही ते म्हणाले. बेस्ट आणि एसटी महामंडळाने अत्यावश्यक घटकांसाठी आपल्या मर्यादीत फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. दररोज बेस्टच्या सर्वसाधारण दोन हजार फेऱ्यांद्वारे मुंबई शहरातील डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पालिका कर्मचारी वर्गाला सेवा देण्यात येत आहे. यापुढेही अत्यावश्यक सेवेत मोडत असलेले पोलीस, डाॅक्टर, परिचारिका, पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी राखीव बसेस तशाच काही दिवस सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०० कोटींचे नुकसान
२३ मार्चपासून लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून बेस्ट बस सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लाॅकडाऊन घोषित होण्याआधी रोज २,८०० बसेसने ३२ लाख प्रवासी प्रवास करत होते. लाॅकडाऊन आधीच प्रवाशांच्या माध्यमातून २ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल मिळत होता. परंतु लाॅकडाऊनच्या ७५ दिवसांत सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.