23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रनिष्ठेचे स्थान एकच

निष्ठेचे स्थान एकच

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, नुकतेच पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही पार पडले. मात्र, या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपवर आपले टीकास्त्र कायम ठेवले. आता पुन्हा एकदा शिवसेनेने शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दलचे दावे केले आहेत.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले की, पुराणात प्रतिसृष्टी उभारण्याची कोणीतरी भानगड केली होती. पुढे काय झाले, याची माहिती दादरच्या सदोबा हगवणकराने घ्यावी. काहींनी प्रतिपंढरी, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे निर्माण करून तुंबड्या भरल्या, पण श्रद्धेचे व निष्ठेचे स्थान एकच असते. शिवसेनेच्या बाबतीत तर तेच प्रखर सत्य आहे.

तेव्हा या सत्याच्या प्रखर तेजाकडे बघण्याचा प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये. पुन्हा आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. ५६ वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे.

ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे. शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही.

महाराष्ट्राच्या नशिबी जे भोग सध्या आले आहेत त्यातून मार्ग कसा काढावा याच विवंचनेत जनता आहे. ‘ईडी-पिडी’ बळाचा वापर करून राज्याच्या मानेवर चाळीस पिंपळांवरचा मुंजा बसविला. त्यामुळे सकाळी उठून पाहावे तर राज्यात एक नवी भानगड झालेली दिसते. यापैकी एकाही भानगडीशी शिवसेनेचा संबंध नाही. ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तारले आणि त्यानंतर खातेवाटपही रडतखडत झाले. लोकांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना नाइलाजाने खातेवाटप जाहीर करावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या