जळगाव : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मोठा वाताहात झाली आहे. अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी हे शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण, दुसरीकडे, निष्ठावंत शिवसैनिक अजूनही सेनेतच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जळगावात मोठ्या प्रमाणात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून घेतले जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली असून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातही याचा परिणाम पहायला मिळत आहे. त्याच पाश्वभूमीवर उध्दव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होवू नये म्हणून जळगावात शिवसेनेकडून मोठी काळजी घेतली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा असल्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपर प्रतिज्ञापत्र तसेच निष्ठापत्र प्रत्येक शिवसैनिकांकडून भरुन घेतले जात आहे. आतापर्यंत महापालिकेचे नगरसेवक तसंच पदाधिकारी व शिवसैनिक अशा ३०० पेक्षा जास्त जणांनी हे निष्ठापत्र भरुन दिलं आहे. नेमकी उद्धव ठाकरेंची शिवसेना वाचविण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.