मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आज पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेवरचे राजकीय फुटीचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांच्या ६२व्या वाढदिवसानिमित्त सारसबाग गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेनेवरचे राजकीय फुटीचे संकट दूर व्हावे, तसेच उद्धव साहेबांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी बाप्पाला साकडे घालण्यात आले.
‘मातोश्री’वरही रात्री बारा वाजता केक कापून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दरम्यान, शिवसेनेतले बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
उद्धव ठाकरेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांना आवाहन केले होते. भेटी, पुष्पगुच्छ न देता निष्ठेचे शपथपत्र द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’वर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. कुणी उद्धव ठाकरेंसाठी जालन्याहून पायी आले आहे. तर कुणी रक्ताने त्यांचे स्केच बनवून आपली निष्ठा आणि सोबत असल्याची ग्वाही देत शुभेच्छा देण्यासाठी आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिल्या शुभेच्छा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे.
…………