नवी दिल्ली : अन्न सुरक्षा क्षेत्रात आपल्या अन्नाचा दर्जा उत्तम प्रतिचा ठेवत महाराष्ट्राने राज्यांच्या अन्न सुरक्षा निर्देशांकात ७० गुण मिळवत देशात तिसरा नंबर मिळवला आहे.
तर देशात पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. यानंतर गुजरात अन्न सुरक्षेच्या बाबतीत जास्त काळजी घेत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासोबतच खाद्य व्यवस्था सुधारासाठी महाराष्ट्रातील ११ शहरांनाही गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात राज्यांचा अन्न सुरक्षा निर्देशांक-२०२१-२२ जाहीर करण्यात आला. यामध्ये आपल्या राज्याचे अन्नाचा दर्जा किती चांगला आहे यासाठी पाच टप्पे घेण्यात आले. यामध्ये मोठी राज्ये, लहान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अन्न सुरक्षा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आलेख देण्यात आला. महाराष्ट्राने पाचही टप्प्यांमध्ये उत्तम कामगिरी नोंदवत एकूण ७० गुणांसह देशातील एकूण २० मोठ्या राज्यांच्या गटात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
मागच्या वर्षी महाराष्ट्र १५ व्या स्थानावर होता यामुळे यंदा महाराष्ट्राने थेट तिस-या स्थानावर घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते राज्याचे अन्न व सुरक्षा आयुक्त परिमल सिंह यांनी या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला.
राज्याने मनुष्यबळ विकास व संस्थात्मक दर्जामध्ये ११ गुण मिळविले आहेत, अनुपालन मानकात २२ गुण, अन्न परीक्षण-पायाभूत सुविधा आणि निरीक्षण या मानकात १०.५, प्रशिक्षण व क्षमता बांधणी मानकात १० आणि ग्राहक सबलीकरण मानकात १६.५ असे एकूण पाच मानकांत १०० पैकी ७० गुण मिळविले आहेत. ८२ गुणांसह तामिळनाडू प्रथम तर ७७.५ गुण मिळवून गुजरात दुस-या स्थानावर राहिले आहेत.
राज्यातील ११ शहरांची सरस कामगिरी
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने वर्ष २०२१-२२ साठी अन्न व्यवस्था सुधार कार्यक्रमांतर्गत देशातील जिल्हा व शहारांसाठी ‘ईट राईट चॅलेंज’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ११ शहारांनी चमकदार कामगिरी करून पुरस्कार पटकाविला. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला व पुरस्कारही वितरीत करण्यात आले. यात राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, वर्धा, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर या शहरांचा समावेश आहे.