नवी दिल्ली : तेलंगणामार्गे दक्षिणेतील दिग्विजयासाठी आक्रमकपणे पुढे जाताना भाजपला आपल्या हिंदुत्त्वाच्या प्रतिमेचा ‘मेकओव्हर’ करणे अपरिहार्य असल्याचे ओळखून पक्षनेतृत्वाने त्या दिशेने पावले टाकली आहेत.
हैदराबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षनेत्यांना अल्पसंख्यांक, विशेषत: पसमांदा मुस्लिम व आदिवासी ख्रिस्ती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा असे सांगून, देशाच्या विविध भागांत ‘स्रेहयात्रा‘ काढण्याचे निर्देश दिले.
डावे पक्ष व कॉँग्रेसने भाजपच्या विरोधात धर्माच्या दारावरून चालविलेल्या प्रचारमोहीमेला छेद देण्याची ‘हीच ती उत्तम वेळ’ असे पक्षनेतृत्वाला वाटते. सध्याच्या चर्चेप्रमाणे उपराष्ट्रपतीपदी मुख्तार अब्बास नक्वी किंवा अन्य अल्पसंख्यांक समाजातील भाजप नेत्याची निवड झाल्यास त्याचा भाजपला या मोहीमेत प्रचंड फायदा होईल असाही विश्वास पक्षाला वाटतो.
पंतप्रधानांनी पसमांदा मुसलमान व आदिवासी ख्रिस्ती समाजाचा आपल्या भाषणात विशेष उल्लेख केल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. पसमांदा हा उत्तर प्रदेशासह देशभरात आढळणारा मुस्लिम समाजातील मोठा वर्ग आहे. हा समाज अद्याप सुविधांपासून वंचित आहे व शिक्षणाचेही प्रमाण त्यांच्यात तुलनेने कमी असते. गरीबीचे प्रमाण जास्त असते. मुख्यत: मोमीन, अंसारी, सय्यद, खाटीक यांसारख्या मागासवर्गीय मुस्लिम जातींचा समाज असून त्यांच्यापर्यंत केंद्राच्या कल्याणकारी सुविधा पोहोचविल्या पाहिजेत असे पंतप्रधान म्हणाले.
तेलंगणा व दक्षिण भारतात आक्रमकपणे आपली ओळख बनवायची तर भाजपच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचा मोठा अडसर ठरणार हे भाजप नेतृत्वाच्या पुन्हा लक्षात आले आहे. उत्तर व मध्य भारतात पक्षविस्तारासाठी आता मर्यादा आहेत, कारण येथील बहुतांश राज्ये भाजपच्या पंखाखाली आली आहेत. त्यामुळे नवनवीन राज्यांकडे पक्षनेतृत्वाने लक्ष वळवले आहे.
राज्यसभेच्या राष्ट्रपतीनियुक्त सदस्यांच्या पहिल्या यादीकडे लक्ष टाकले तरी हे स्वच्छपणे लक्षात येते. वरिष्ठ सभागृहापुरते भाजपचे हेच धोरण यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र आंध्र प्रदेश, केरळ असो की तमिळनाडू तेथे भाजपला हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून विस्तारासाठी प्रचंड मर्यादा येतात.
त्यामुळेच भाजपने आता देशभरातील मुस्लिम-ख्रिश्चनांतील मागास घटकांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे व दक्षिणेतील प्रादेशिक पक्ष, डावे पक्ष व उरलीसुरली कॉँग्रेस यांच्याकडे वळणा-या या समाजात भाजपबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी जोरदार पयत्न केले पाहिजेत असे धोरण ठरविण्यात आले आहे.