22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रमराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सणासारखाच साजरा व्हायला हवा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन सणासारखाच साजरा व्हायला हवा

एकमत ऑनलाईन

मुंबई : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ वाजता होणारा कार्यक्रम सकाळी ७ वाजता उरकला त्यावरूनही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असे आवाहन केले आहे.

राज ठाकरेंनी ट्विटरवरून एक पत्र शेअर करत, आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन. मराठवाडा मुक्तिसंग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैदराबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला हवा , असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पत्रात नेमकं काय?
आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरे तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्तिसंग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैदराबादच्या निजामाला हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवे होते आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्षे आधी तयारी सुरू होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

मला असे नेहमी वाटते, या इतक्या मोठ्या लढ्याबद्दल आपल्याकडे ब-यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचे या विषयावरचे पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या, मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची व्याख्याने यूट्यूबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असे वाटते की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसे कोणाला माहित नाही.

माझे तर म्हणणे आहे की आता जे नवे शिक्षण धोरण येत आहे, त्यानुसार त्या-त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा, हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये.

पण मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसे बोलले का जात नसेल? अर्थात ‘रझाकारांचे लांगुलचालन करण्यात धन्यता मानणा-यांचे सरकार कित्येक वर्षे राज्यात होते, त्यामुळे हे होणे स्वाभाविक होते. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते, आणि दुर्दैव असे की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक सजाकार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्षे संभाजीनगर महापालिकेच्या खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार अर्थात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेलच, असो! आजच्या मुक्तिसंग्रामाच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा आणि माझे मराठवाड्यातील जनतेला आवाहन आहे की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील गौरवशाली लढा आहे, त्याचे विस्मरण होऊ देऊ नका. आधुनिक रझाकारांच्या विरोधातील लढ्यात हाच इतिहास आपल्याला बळ देणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या