Saturday, September 23, 2023

मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती हवी

छ. संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्रामाला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. अर्थात, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आज अमृत महोत्सवी दिवस आहे. त्यानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभावर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. मराठवाड्याला मागास या शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे. मराठवाडा समृद्ध व्हावा, अशी आपण प्रतिज्ञा करुया, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा. अनेक ध्येयवादी स्वातंत्र्य सैनिकांच्या अमूल्य बलिदानातून आणि जनतेच्या सक्रीय पाठिंब्यातून मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला. याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे, अशी प्रतिज्ञा यानिमित्ताने आपण करुया. मराठवाड्याच्या भूमीला समृद्ध करण्यासाठी आपण सदैव वचनबद्ध राहू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी शिंदे यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवरही टीका केली. आम्ही आता मराठवाड्याला निधी देत आहोत. मागील सरकारच्या काळात मराठवाड्याचा अनुशेष वाढला. विकास योजनांची तेव्हा अंमलबजावणी केलेली नाही. ही थांबलेली कामे आम्ही सुरू केली. मराठवाड्याच्या विकासाचे पर्व आता सुरू झाले. कालच आम्ही ६० हजार कोटींच्या योजनांची घोषणा केली. ही कामे आम्ही वेगाने पूर्ण करू, असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यलढ्याइतकेच महत्त्व
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ हा मराठवाड्याच्या त्यागाचा, शौर्याचा, संघर्षाचा गौरवशाली इतिहास आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्यलढ्याइतकेच आहे, असे म्हटले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या