बीड : बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ३२ जणांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये नवरी, नवरदेवाच्या आई-वडिलांसह फोटोग्राफर, आचारी, लग्न लावणारा ब्राह्मण आणि काही प्रतिष्ठित लोकांचा समावेश आहे.
या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात ग्रामसेवक शंकर मुरलीधर म्हेत्रे यांनी आष्टी ठाणे गाठून फिर्याद दिली. ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून ३२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नवरदेवाचा मामा, नवरीचा मामा, फोटोग्राफर, वाजंत्रीवाले, मंडपवाले, लग्न लावणारे ब्राह्मण, आचारी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.