36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडामार्श, वॉर्नर या कांगारूंमुळे दिल्लीच्या आशा कायम

मार्श, वॉर्नर या कांगारूंमुळे दिल्लीच्या आशा कायम

एकमत ऑनलाईन

दिल्ली विरुद्ध राजस्थान यांच्यात बुधवारी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएल २०२२ चा ५८वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आर. अश्विन आणि देवदत्त पडिक्कलने झुंजार खेळी केली. परंतु प्रत्युत्तरात दिल्लीचे ऑस्ट्रेलियन मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर राजस्थानवर भारी पडले. दिल्लीने ८ गडी व ११ चेंडू राखून राजस्थानवर विजय मिळवला. हा दिल्लीचा हंगामातील सहावा विजय. या विजयासह दिल्लीने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबई व पंजाबविरुद्धचे सामने जिंकल्यास दिल्लीला प्लेऑफची संधी मिळू शकेल तसेच राजस्थान व बंगळुरूने उरलेल्या दोन्ही सामन्यांत पराभूत व्हावे लागेल.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीस पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ६ बाद १६० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने १८.१ षटकांतच दोन विकेट गमावून राजस्थानचे आव्हान पूर्ण केले. दिल्लीकडून मिचेल मार्शने ६२ चेंडंूत ७ षटकार आणि ५ चौकार मारत सर्वाधिक ८९ धावा फटकावल्या. सलामीवीर श्रीकर भरतची शून्य धावेवर विकेट गमावल्यानंतर मार्शची ही खेळी संघासाठी महत्त्वपूर्ण ठरली. मार्शव्यतिरिक्त सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने ४१ चेंडंूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५१ धावा फटकावल्या. तसेच कर्णधार रिषभ पंतने शेवटी फलंदाजीला येत ४ चेंडंूत नाबाद १३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या डावात राजस्थानचे गोलंदाज मात्र सपशेल फेल ठरले. राजस्थानकडून केवळ ट्रेंट बोल्ट आणि यझुवेंद्र चहल यांना १-१ विकेट घेता आली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर (७)या सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. यशस्वी जयस्वालही १९ धावांवर बाद झाला. परंतु पुढे आर. अश्विन आणि देवदत्त पडिक्कलने राजस्थानचा डाव सावरला. अश्विनने ५० धावांचे योगदान दिले. तर पडिक्कल ३० चेंडूंत ४८ धावा करून बाद झाला. तिस-या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अश्विनने आधी यशस्वी जयस्वाल आणि नंतर देवदत्त पडिक्कल यांना साथीला घेत ३७ चेंडू खेळताना १३१.५८च्या स्ट्राईक रेटने २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ५० धावांची प्रशंसनीय खेळी केली. या सामन्यात रियान परागच्या बॅटमधून अवघ्या ९ धावा निघाल्या. या छोट्याशा खेळीमध्ये रियानने एक उत्कृष्ट षटकार मारला. हा षटकार डावातील १७व्या षटकातील नॉर्कियाच्या चौथ्या चेंडूवर रियानने षटकार मारलेला हा चेंडू नॉर्कियाने १४३.४ किमी ताशी गतीने टाकला होता, पण फलंदाजाने यावर सहज षटकार मारला. रियानने ज्या सहजतेने हा ९२ मीटरचा षटकार मारला, ते पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या हे नक्की. अनेकजण रियानला भारतीय संघाचा भविष्यातील फिनिशर म्हणू लागले आहेत. त्याने मारलेल्या षटकाराचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या खेळींच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकांत ६ विकेट्सच्या नुकसानीवर १६० धावा केल्या. या डावात दिल्लीच्या गोलंदाजांनीही चांगले प्रदर्शन केले. चेतन सकारियाने संघाला २ महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. तसेच एन्रिच नॉर्किया आणि मिचेल मार्श यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या