23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक

एकमत ऑनलाईन

मुंबई : कागदावरील संख्याबळ अनुकूल असल्याने महाविकास आघाडी राज्यसभेच्या ६ पैकी ४ जागा सहज जिंकेल, अशी स्थिती असताना प्रत्यक्षात भाजपाने ३ जागा जिंकून आघाडीला, शिवसेनेला धक्का दिला. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सहाव्या जागेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. अपक्षांसह ११३ जागांचे पाठबळ असलेल्या भाजपाने १० अतिरिक्त मते मिळवली. दुस-या पसंतीच्या मतांचे काटेकोर नियोजन करत भाजपने हा धक्का दिला.

राष्ट्रवादीच्या नवाब मलिक व अनिल देशमुख यांना मतदानाची संधी मिळाली असती व शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद झाले नसते तरी भाजपाचाच विजय झाला असता. यामुळे होणा-या २० जून रोजी गुप्त मतदानाने होणा-या विधानपरिषदेच्या १० जागांची निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. मतदानाच्यावेळी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शिवसेना व भाजपाने घेतलेल्या आक्षेपामुळे राज्यसभेची मतमोजणी काल खोळंबली होती. अखेर रात्री दीड वाजता केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवत मतमोजणीला परवानगी दिली व ३ वाजता निवडणुकीचे निकाल लागले.

भाजपाचे पियुष गोयल (४८ मते) व डॉ. अनिल बोंडे (४८), काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी (४४) राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (४३) व शिवसेनेचे संजय राऊत (४१ मते) हे पाच जण पहिल्याच फेरीत निवडून आले, तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना ३३ तर धनंजय महाडिक यांना २७ मते मिळाली. गोयल व बोंडे यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ४८ मते मिळाली होती. त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्या मतपत्रिकेवरील दुस-या पसंतीची मते मोजण्यात आली व ४१ मतांचा कोटा पूर्ण करून धनंजय महाडिक निवडून आले. भाजपाच्या तीन उमेदवारांना १२३ मते मिळाली. खुले मतदान असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेची मते आपापल्या उमेदवारांना मिळाली. पण छोट्या पक्षांची व अपक्षांची मते न मिळाल्याने फटका बसला.

घोडेबाजारामुळे पराभव : राऊत
संजय पवार यांच्या अनपेक्षित पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याबद्दल त्यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षांना जबाबदार धरले. बहुजन विकास आघाडी आणि दोन अपक्ष आमदारांनी शेवटच्या क्षणी टांग दिल्याने राज्यसभा निवडणुकीत आमचा पराभव झाल्याचा दावा केला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे, सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष संजयमामा शिंदे, मोर्शीचे देवेंद्र भुयार या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा दावा राऊत यांनी केला.

आघाडीची ९ मते फुटली!
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, तेव्हा आघाडीचे संख्याबळ १७० होते. यावेळी एमआयएम व बहुजन विकास आघाडीच्या पाच आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. पण प्रत्यक्षात त्यांना केवळ १६२ मते मिळाली. त्यामुळे आघाडीची ८ ते १० मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

फडणवीस मॅन ऑफ द मॅच
भाजपाकडे तिसरी जागा लढविण्यासाठी आवश्यक संख्याबळ नव्हते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्­वाला सर्व गणित समजावून सांगत तिसरी जागा लढविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे आघाडीनेदेखील ही निवडणूक अतिशय गंभीरतेने घेतली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्­ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ कामकाजातील अर्क समजले जाणारे सर्व नेते एकत्रित बैठका घेऊन रणनिती ठरवत होते. दुसरीकडे फडणवीस यांनी भाजपची स्­ट्रॅटजी एकहाती सांभाळली आणि संख्याबळ नसताना ६ वा उमेदवार विजयी करून दाखविला.

विधानपरिषद निवडणूक शिवसेनेचे वर्षावर मंथन
राज्यसभा निवडणुकीत भाजपने सहापैकी तीन जागा जिंकून विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार पराभूत झाले. हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असून शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शनिवारी सायंकाळी वर्षा निवासस्थानी तातडीने महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली. यावेळी पराभवावर मंथन करण्यात आले.

आता चुरशीची होणार !
राज्­यसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारल्याने येत्­या २० जून रोजी होणा-या विधानपरिषदेच्या १० जागांसाठीची निवडणूक अत्­यंत चुरशीची होणार हे उघड आहे. भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे अधिकृत पाच उमेदवार उतरवले असून सहाव्या जागेसाठी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजप राज्यसभेत बहुमतापासून दूरच
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रातील सत्तारूढ भाजपला उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात आनंद साजरा करता आला तरी वरिष्ठ सभागृहातील निर्भेळ बहुमतापासून भाजप अजून दूरच आहे. किंबहुना या निवडणुकीत भाजपला राज्यसभेत ४ जागांचा घाटाच झाला. त्यामुळे भाजपची सदस्यसंख्या १०० च्या आत म्हणजेच ९१ वर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या