भूकंपग्रस्त भागात तीन महिने आणीबाणी जाहीर
अंकारा : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या विनाशकारी भूकंपातील बळींची संख्या आता ६२०० वर पोहोचली आहे. बचावकार्य सध्या वेगात सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मृताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. या भीषण घटनेमुळे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपग्रस्त भागात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. डब्ल्यूएचओनेही उर्वरित देशांना सीरियाला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन केले आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी सकाळी ७.८, ७.६ आणि ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग तीन विनाशकारी भूकंप झाले. यामध्ये आतापर्यंत ६२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने भूकंपामुळे दोन्ही देशातील २३ कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी रस्त्याशेजारील इमारती, घरेही कोसळली. तुर्कीत सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळाला. प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन पळत होता. तुर्कीत भूंकपाच्या तीव्र धक्क्यांमुळे रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. शेकडो इमारती कोसळल्या आहेत. अनेक जण ढिगा-याखाली अडकले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोकांना घरातून सुरक्षित स्थळी जाण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण अजूनही ढिगा-याखाली अडकलेले आहेत.
तीन महिन्यांसाठी आणीबाणी
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मंगळवारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या १० आग्नेय प्रांतांमध्ये तीन महिन्यांसाठी आणीबाणीची घोषणा केली. एर्दोगन म्हणाले की मानवतावादी मदत कर्मचारी आणि आर्थिक मदतीसह प्रभावित भागात अनेक आपत्कालीन उपाययोजना केल्या जातील. आम्ही या निर्णयाशी संबंधित प्रक्रिया लवकर पूर्ण करू, ज्यामध्ये आमचे १० प्रांत समाविष्ट असतील. भूकंप झालेल्या प्रदेशात ५० हजारांहून अधिक मदत कर्मचारी पाठवले आहेत.