वर्धा : राज्यात गोवरने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यातील नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यातच आता वर्ध्यात देखील गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सात मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात सध्या गोवरच्या आजाराने डोके वर काढले आहे. बालकांच्या हातापायाला बारीक बारीक चट्टे येत आहेत. ही साथ ‘ब्रेक’ करण्यासाठी बालकांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात १० हजार ८७४ बालकांना पहिला डोस तर १९०० बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला व दुस-या डोसपासून वंचित बालकांना संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. मंगेश रेवतकर यांनी केले आहे.
बालकांमध्ये गोवरच्या आजाराची साथ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही आरोग्य विभागाकडून बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. गोवर आजार जडू नये म्हणून माता व बाल संगोपन विभागाच्या माध्यमातून गावागावांत सर्वेक्षण सुरू आहे. बालकांच्या रक्ताचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहेत.
आरोग्य विभागाच्या माता व बालसंगोपन विभागातील डॉक्टरांचा चमू अलर्ट झाला असून, आठही तालुक्यांत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये बालकांची तपासणी केली जात आहे. आरोग्य कर्मचा-यांकडून सर्वेक्षण सुरू आहे.