नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) सामने म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच. क्रिकेटवेड्या भारतात आयपीएल सामने बघणा-यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्यामुळे हे सामने प्रक्षेपण करण्याची संधी कोणत्या कंपनीला मिळणार, याकडे लक्ष होते. दरम्यान २०२३ ते २०२७ पर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने तब्बल ४३ हजार कोटी ३९० रुपये मिळवले आहेत.
यावेळी भारतातील टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने तर डिजीटल हक्कांसाठी वायकॉम १८ ने बाजी मारली. त्यामुळे टीव्हीवर आयपीएलचे सामने हे स्टार स्पोर्ट्सवरच दिसणार असून ऑनलाईन सामने मात्र वूटवर पाहावे लागणार आहेत. याशिवाय पॅकेज सी ज्यामध्ये एका सीजनच्या १८ निवडक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असणार आहेत. ते वायकॉम १८ ने विकत घेतले आहेत. याशिवाय परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे पॅकेज डी वायकॉम १८ आणि टाईम्स इंटरनेट यांनी मिळून विकत घेतले आहेत. या सर्वाबाबतची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्वीट करत दिली आहे. या लिलावानंतर आयपीएल जगातील दुसरी सर्वात महागडी लीग झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आयपीएलच्या पुढील पाच हंगामासाठी म्हणजेच २०२३ ते २०२७ या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क, तसेच प्लेऑफच्या निवडक सामन्यांसाठीचे हक्क आणि परदेशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क अशा एकूण चार पॅकेजेसची विक्री यावेळी झाली. हा संपूर्ण व्यवहार ४८ हजार ३९० कोटींमध्ये झाला. यावेळी टीव्हीसाठीचे हक्क डिजनी स्टारने आपल्याकडे कायम ठेवले. यासाठी त्यांनी २३ हजार ५७५ कोटी रुपये मोजले.