24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeजालना    जालन्यात चारित्र्याच्या संशयावरून मायलेकीची हत्या

    जालन्यात चारित्र्याच्या संशयावरून मायलेकीची हत्या

एकमत ऑनलाईन

जालना : येथील सोनल नगर भागात चारित्र्याच्या संशयावरून मायलेकीची हत्या केल्याची घटना सोमवार दि. १६ मेरोजी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भारती गणेश उर्फ संजू सातारे (३६) आणि तिची मुलगी वर्षा सातारे (१७) अशी या दोघींची नावे असून या खून प्रकरणात सदर महिलेचा पती, सवत आणि सवतीचा मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी मिळून चारित्र्यावर संशय घेऊन या दोघींना ठार मारण्यात आल्याची फिर्याद भारती सातारे यांच्या बहिणीने दाखल केली होती.

सोनलनगर भागातील भारती गणेश उर्फ संजू सातारे आणि तिची मुलगी वर्षा सातारे या मायलेकीचे मृतदेह सोमवारी सकाळी राहत्या घरात आढळून आले होते. घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मजहर अली, सहायक पोलिस निरीक्षक देविदास सोनवले यांच्यासह कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दोन्ही मृतदेह तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.

भारती सातारे यांच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात मारहाणीचे घाव आणि जखमांच्या खुणा असून अंगावर रक्त गोठवलेल्या स्थितीत असल्यामुळे ही घटना पहाटेपूर्वी घडल्याचा तसेच हा दुहेरी खून कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी त्यानुसार सूत्रेही हलविण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर याप्रकरणी भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

भारती व वर्षा सातारे यांना चारिर्त्यावर संशय घेऊन तिचा पती गणेश उर्फ संजू सातारे, सवत सीमा सातारे, सवतीचा १६ वर्षाचा मुलगा या तिघांनी बेदम मारहाण केली होती. गेल्या १५ दिवसांपासून आणि काल रात्रभर सुरू असलेल्या या मारहाणीतच त्या मायलेकीचा मृत्यू झाला, असा संशय या फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती, तिचे पूर्वी लग्न झालेले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली असून एकीचे लग्न झाले आहे, तर दुसरी मुलगी वर्षा होती.

भारती यांचे गणेश सातारेसोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने पहिल्या पतीने भारतीशी १५ वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला होता. याप्रकरणी आरोपी गणेश उर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी सीमा सातारे आणि १६ वर्षाचा मुलगा अशा तिघांविरोधात भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या