मुंबई : इंडियन प्रिमिअर लीगच्या मोठ्या यशानंतर आता महिलांसाठीही आयपीएल लवकरच सुरू होत आहे. यासाठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात आज अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लावली. स्मृती मानधना, हरमनप्रीत, शफाली वर्मा या भारतीय महिला क्रिकेटपटूंसह अनेक विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस पडल्याने अनेक महिला क्रिकेटपटू मालामाल झाल्या. मराठमोळी स्मृती मानधना तर सर्वांत महागडी महिला क्रिकेटपटू ठरली. दरम्यान, पहिल्याच लिलावात अनेक दिग्गज महिला खेळाडू अनसोल्ड राहिल्या. त्यामुळे त्यांची निराशा झाली.
महिला आयपीएलच्या आजच्या लिलावात टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला सर्वाधिक ३.४० कोटी रुपयांची बोली लागली. सर्वाधिक बोली लागलेल्या टॉप १० खेळाडूंमध्ये भारताच्या ७ महिलांचा समावेश आहे, तर केवळ ३ महिला खेळाडू इतर देशांच्या आहेत. मराठमोळ््या स्मृती मानधनासाठी ५० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर बोली सुरू झाली होती. मुंबई आणि आरसीबी या संघांनी स्मृतीसाठी बोली लावली. पण आरसीबीने ३.४० कोटी रुपयांत तिला आपल्या ताफ्यात घेतले.
आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही जेतेपद जिंकता आलेले नाही. आता महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने अनेक दिग्गज खेळाडूंना संघात घेतले. यासह आरसीबीने जेतेपदाची तयारी सुरू केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वातही आरसीबीला जेतेपद जिंकता आले नव्हते. विराट कोहलीने अनेकदा ही खंत बोलून दाखवली होती. आता विराट कोहलीचे स्वप्न स्मृती पूर्ण करणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. विराट कोहली आणि स्मृतीच्या टी शर्टवर १८ हा सारखाच क्रमांक आहे.
स्मृतीला आरसीबीने खरेदी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत असलेल्या महिला संघाने केलेल्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरसीबी स्मृतीकडे संघाची धुरा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्मृतीशिवाय आरसीबीने एलिस पेरीला १.७० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले तर न्यूझीलंडच्या डिवाइन सोफीला ५० लाखांच्या बेस प्राइजवर विकत घेतले. तसेच भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह हिला आरसीबीने १.६० कोटींना खरेदी केले आहे.
दिल्लीने शफालीसाठी
मोजले दोन कोटी
अंडर १९ ची कॅप्टन शफाली वर्माला दिल्ली कॅपिट्लसने खरेदी केले. दोन कोटी रुपयांत दिल्लीने शफालीला आपल्या ताफ्यात घेतले. शफाली वर्माच्या नेतृत्वात नुकताच भारताने अंडर १९ विश्वचषक जिंकला होता. शफाली वर्मा भारताच्या सिनिअर संघाचाही भाग आहे. शफाली वर्माला विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जाते.
सर्वाधिक बोली
लागलेले १० खेळाडू
३.४ कोटी : स्मृती मानधना (भारत) -आरसीबी
३.२ कोटी : अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) : जीजी
३.२ कोटी : नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड) : एमआय
२.६ कोटी : दीप्ती शर्मा (भारत) : यूपीडब्ल्यू
२.२ कोटी : जेमिमा रॉड्रिग्ज (भारत) : डीसी
२.० कोटी : शेफाली वर्मा (भारत) : डीसी
२.० कोटी : बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) : जीजी
१.९ कोटी : पूजा वस्त्राकर (भारत) : एमआय
१.९ कोटी : ऋचा घोष (भारत) : आरसीबी
१.८ कोटी : हरमनप्रीत कौर (भारत) : यूपीडब्ल्यू