आ. कदम किरकोळ जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला. अपघातात आमदार योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, ते सुदैवाने सुखरूप आहेत. त्यांच्या चालकालादेखील किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चालकाला चोळई येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. रुग्णालयात आमदार योगेश कदम स्वत: उपस्थित आहेत.
मागून आलेल्या टँकरची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात टँकर पलटी झाला आहे. यामध्ये आमदार योगेश कदम किरकोळ जखमी झाले आहेत. ते सुखरूप आहेत. तसेच ड्रायव्हर दीपक कदमही किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आमदार योगेश कदम मुंबईकडे रवाना झाले. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूरनजीक चोळई येथे मागून येणा-या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलिस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.