27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे १०० कोटींची मागणी

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे १०० कोटींची मागणी

एकमत ऑनलाईन

४ जणांना अटक, ३ आमदार लागले होते गळाला!

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. २० दिवस उलटून गेले आहेत, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच मंत्रिपद मिळवून देण्यासाठी एका आमदाराला मंत्रिपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.

राज्यमंत्रिमंडळाचा अजून विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत. पण मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला १०० कोटी रुपये मागण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एवढंच नाही तर आणखी ३ आमदारांनाही फसवण्याचा प्रयत्न झाला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी या चार भामट्यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळवून देतो असे आमिष दाखवून ३ आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या भामट्यांनी आपण दिल्लीतून आल्याचे सांगितले आणि वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे, अशी थापही मारली. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही, या आमदारांना फोन करून मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणीच केली. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी १७ जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायलासुद्धा बोलावले होते.

मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या आरोपींनी १०० कोटी मागितले होते. यातील २० टक्के रक्कम आता द्यावी लागणार होती त्यानंतर उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची होती, असे या आरोपींनी सांगितले होते. या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉईंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले होते.

याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अँटी एक्स्टॉर्शन सेलने आरोपीला पकडले. या आरोपींची चौकशी केली असता आणखी ३ जणांची नावं समोर आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज अल्लाबक्ष शेख (रा. कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (रा. पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संगवई (रा. ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (रा. नागपाडा, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी आणखी किती आमदारांना अशा प्रकारे फसवले आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या