नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैऋत्य मोसमी वा-यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा मान्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने आणखी एक ट्विट केले आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या तारखेचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात दरवर्षीपेक्षा लवकर होण्याची शक्यता असून केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी दाखल होऊ शकतो.असनी चक्रवादळ हे आता बांगलादेश आणि म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले आहे.
यंदा अंदमानमध्ये १० दिवस आधी मान्सून दाखल होणार आहे. केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे ३१ मे रोजी दाखल होतो. सध्या असनी चक्रीवादळाचे संकट आहे. यामुळे आंध्र प्रदेशला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आज सकाळपासूनच वादळी पावसाला सुरुवात झाली. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरदेखील होणार आहे. त्याबाबत हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली.
सध्या आसनी चक्रीवादळाचे संकट आहे. त्यामुळे आज ९ मे आणि उद्या १० मे रोजी काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमारांनादेखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळाचे तीव्र वादळात रुपांतर होईल. त्यानंतर येत्या ४८ तासांत हळूहळू तीव्रता कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
आंध्रच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा
सध्या असनी चक्रीवादळ निवळत असले तरी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेश व परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे रेड अलर्ट
गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी वारे २१ मेदरम्यान अंदमानात तर ३ जूनदरम्यान केरळमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मॉन्सून ५ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता. सध्या असनी चक्रीवादळामुळे समुद्रकिनारी असणा-या प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पश्चिम किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू आहे.