19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयओव्हरलोडमुळेच कोसळला मोरबीचा पूल

ओव्हरलोडमुळेच कोसळला मोरबीचा पूल

एकमत ऑनलाईन

नूतनीकरण नावाला, पुलाच्या लाकडी पायांच्या जागी अल्युमिनियमच्या पत्र्याचे थर, वजन वाढले

राजकोट : मोरबीच्या झुलत्या पुलाची दुर्घटना नवीन फ्लोअरिंगमुळे घडली. नूतनीकरणाच्या नावाखाली पुलाच्या लाकडी पायाच्या जागी ऍल्युमिनियमच्या पत्र्याचे चार थर लावण्यात आले. त्यामुळे पुलाचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले. जुन्या केबल्सना हा भार पेलता येत नसल्याने गर्दी वाढताच हा पूल कोसळला. गुजरात पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली.

मोरबीमध्ये ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी झुलता पूल कोसळल्या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली होती. त्यांना मंगळवारी मोरबी येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींच्या कोठडीसाठी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पूल कोसळण्याचे कारण सांगितले. या घटनेत आतापर्यंत १३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात पोलिसांनी मंगळवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात पूल दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल दाखल केला. हा अहवाल सीलबंद कव्हरमध्ये सादर करण्यात आला. सरकारी वकील पांचाळ यांनी सुनावणीअंती सांगितले की, पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड अर्जात हे स्पष्ट लिहिले आहे की, पुलाच्या रचनेच्या बळावर दुरुस्तीचे काम झाले नाही. पुलाच्या फरशीतून फक्त लाकूड काढून ऍल्युमिनियमचे पत्रे बसवण्यात आले.
सरकारी वकील पांचाळ यांनी सांगितले की, फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या तपासणीत असे आढळून आले आहे की, ज्या चार केबल्सवर पूल आहे, त्या दुरुस्तीच्या सहा महिन्यांत बदलण्यात आल्या नाहीत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते नवीन फ्लोअरिंगसह खूप जुन्या केबल्स लोकांचे वजन सहन करू शकल्या नाहीत आणि जास्त वजनामुळे केबल तुटल्या. मोरबीच्या ऐतिहासिक पुलाचे ७ महिन्यांत २ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्याचा दावा करण्यात आला होता. परंतु पूल सुरू होताच अवघ्या ५ दिवसांतच तो कोसळला. पुलावर अचानक लोकांची गर्दी झाल्याने ओव्हरलोडमुळे पूल कोसळला.

अपात्र कंत्राटदारांकडून
करून घेतली दुरुस्ती
पुलाच्या दुरुस्तीचे काम ज्या कंत्राटदारांना देण्यात आले. ते करण्यास पात्र नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यांना झुलत्या पुलाचे तंत्रज्ञान आणि संरचनेच्या मजबुतीबद्दल आवश्यक ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी केवळ पुलाच्या वरच्या सजावटीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच पूल तंदुरुस्त दिसत होता, पण आतून कमकुवत होता, असे सांगण्यात आले.

अतिभारामुळे पिन उखडली
स्ट्रक्चरल अभियंत्यांनी या दुर्घटनेची चौकशी केली असता दुरुस्तीदरम्यान केबल धरून ठेवलेल्या अँकर पिनच्या मजबुतीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच अतिभारामुळे पुलाच्या दरबारगड टोकावरील अँकरची पिन उखडून पूल एका बाजूने वाकून नदीत पडला, असे आढळून आले.

पूल दुर्घटना प्रकरणी
नऊ जणांना अटक
पूल दुर्घटनेप्रकरणी दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मदेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या