पंढरपूर/ अपराजित सर्वगोड : भूवैकुंठ पंढरी नगरीतील विठुरायाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी, देहू आणि विविध ठिकाणाहून निघालेल्या संतांच्या पालख्या विठू नामाच्या जयघोषात आणि टाळ्या मृदुंगाच्या गजरामध्ये विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत शनिवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे यंदाच्या आषाढी वारीसाठी बारा लाख हून अधिक भाविक पंढरपूरात दाखल झाले आहे.
आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याचबरोबर भाविकांच्या दर्शनाची सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे. दर्शन बारीतील भाविकांना दर्शनासाठी भाविकांना सुमारे ३० तास लागत आहेत. भूवैकुंठ पंढरी नगरीतील आषाढी यात्रेसाठी दाखल झालेले भाविक चंद्रभागेमध्ये स्रान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. नामदेव पायरी बरोबरच ते आपल्या विठुरायाचे देखील दर्शन घेत आहेत.
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले वारकरी अगोदर चंद्रभागेमध्ये स्रान करतात आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात वारक-यांना स्रान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून चंद्रभागेमध्ये दुथडी भरून स्वछ पाणी सोडण्यात आले आहे. वारक-यांबरोबरच काही हुलडबाज तरुण देखील चंद्रभागेमध्ये स्रान करण्यासाठी येतात आणि यावेळी काही अवचित प्रकार घडू नये म्हणून एनडीआरएफची पथके चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. वारक-यांच्या सुरक्षतेसाठी २४ तास ही पथके चांद्रभागेमध्ये गस्त घालत आहेत. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणीही हुल्लडबाजी करू नये असे आवाहन एनडीआरएफच्या पथकाने केले आहे.