नागपूर : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत करताच विधानपरिषदेत त्याचे पडसाद उमटले. विरोधकांच्या मागणीवरून उपसभापती निलम गो-हे यांनी मुंबईच्या खासदाराची बलात्कार प्रकरणी झालेल्या आरोपांची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे केली जावी, असे निर्देश दिले.
सत्ताधा-यांनी विधानसभेत सालीयनचा मुद्दा रेटून धरला. त्यामुळे विरोधकांनीही परिषदेत मुंबईतील एका खासदाराचा मुद्दा लावून धरला. या खासदारावर एका तरुणीला फसवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ते संसदेचे सदस्य असल्याने नियमानुसार नोटीस दिल्याखेरीज त्यांचे नाव घेता येत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या मनिषा कायंदे आणि अनिल परब यांनी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशन अंतर्गत हा मुद्दा संबंधित खासदाराचे नाव न घेता मांडला.
हा खासदार मुंबईतील असून एका तरुणीने त्याच्यावर बलात्काराचे आरोप केलेत. या खासदारापासून तिच्या जिवाला धोका आहे. या प्रकरणी तिचे जबाब झालेले असले तरीसुद्धा पोलिस सत्ताधा-यांच्या दबावात असल्यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. तो दाखल करण्यात यावा आणि या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी केली. दरम्यान हा खासदार शिंदे गटाचे मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे आहेत.
राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले होते.
यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच ‘एयू एयू‘ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर शिवसेना व राष्ट्रवादीच्याही सदस्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. तिन्ही पक्षांचे सदस्य सभागृहाच्या वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले. अखेर, उपसभापती निलम गो-हे यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, असे निर्देश दिले.