नागपूर : मुंबई ही आमच्या बापाचीच, मेलो तरी कुणाला देणार नाही असे वक्तव्य करत जितेंद्र आव्हाडांनी कर्नाटक सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी कर्नाटकच्या कायदेमंत्र्यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद आज महाराष्ट्र विधिमंडळातही दिसू लागले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर ‘‘उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचा तीव्र शब्दांत निषेध केलेला आहेच.
पण माझी अशी भूमिका आहे, मुख्यमंत्री बोम्मईंना मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडवायची आहे. त्यांची पायाखालची जमीन हललेली आहे. कर्नाटकात कुठल्याही परिस्थितीत आताचे सरकार येऊ शकत नाही. त्यामुळेच मराठी माणसाला डिवचून कन्नडीगांना एकत्र करण्याचा घाणेरडा प्रकार त्यांच्याकडून सुरू आहे. केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन कर्नाटककडून होत आहे. महाराष्ट्र जास्त काळ आपला अपमान सहन करणार नाही. मुंबई ही आमच्या बापाचीच आहे. कुणी कितीही म्हणो आम्ही मेलो तरी चालेल, पण मुंबई कुणाला देणार नाही.’’ असा इशाराच आव्हाड यांनी दिला.
‘‘काल कर्नाटकच्या विधिमंडळात मुंबई कर्नाटकचीच आहे, असे नालायक बोम्मईंच्या मंत्रिमंडळातील एक नालायक मंत्री म्हणतो. मग दुसरा मंत्री पुढे येतो आणि म्हणतो की, मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात. हे अर्थाअर्थी खोटं आहे. १०५ हुतात्म्यांनी रक्त वाहिल्यानंतर मुंबईचा नकाशा तयार झाला. आम्ही मेलो तरी चालेल, पण मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी कुणाच्या तरी तोंडातून हे वदवून घ्यायचे. मग देशभर चर्चा घडवून आणायची, असे अजिबात चालणार नाही.’’, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
मराठी माणसाच्या हृदयाला चिमटे काढण्याचे कारस्थान
कर्नाटककडून वारंवार होणा-या चिथावणीखोर वक्तव्याचा निषेध करत आव्हाड म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचे मुंबईवर नितांत प्रेम आहे. कारण मुंबईने मराठी माणसालाच नाही तर प्रत्येक भारतीयाला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. कर्नाटक सरकारने काल जे काही केले, त्यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना जाब विचारला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगूनही वारंवार मराठी माणसाच्या हृदयाला चिमटे काढण्याचे काम कर्नाटकाकडून केले जात आहे.’’