शादाब जकातीने केले धोनीचे कौतुक
नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपील स्पर्धेच्या २०१० च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले. उत्तम फलंदाज आणि भेदक मारा करणारे गोलंदाज असा समतोल संघ असणाºया चेन्नईने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. संघात फिरकीपटू म्हणून असलेल्या डावखु-या शादाब जकातीने त्या हंगामात उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. अंतिम सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला फिरकीच्या जाळ्यात ओढलं होतं. मात्र यामागचं डोकं सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं होतं.
२०१० च्या अंतिम सामन्याबाबत शादाब जकातीने नुकत्याच विस्डन इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की धोनीच्या एका महत्त्वाच्या प्लॅनमुळे सीएसकेला त्यांचं पहिलंवहिलं आयपीएल विजेतेपद मिळू शकलं होतं. ‘‘अंतिम सामन्यात माझ्या पहिल्या दोन षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी २१ धावा ठोकल्या होत्या. डावखुरा अभिषेक नायर फलंदाजी करत असल्याने धोनीने मला गोलंदाजीवरून काढून टाकले आणि सांगितले की तुला १२ व्या षटकानंतर पुन्हा गोलंदाजी करायची आहे. मुंबईकडे सचिन तेंडुलकर, अंबाती रायडू आणि कायरन पोलार्ड असे प्रतिभावंत उजव्या हाताचे फलंदाज आहेत, त्यांना तू गोलंदाजी कर’’, असे जकाती म्हणाला.
Read More धक्कादायक : माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून घेतला संन्यास
‘‘मुंबईच्या उजव्या हाताच्या फलंदाजांचा आम्ही अभ्यास केला होता. ते डावखुºया फिरकीपटूच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यात कमी पडत होते हे आम्हाला कळले होते. त्यामुळे धोनीने तसा प्लॅन आखला. मुंबईच्या संघाची गाडी नीट रूळावर होती. त्यांना शेवटच्या सहा षटकात ७४ धावा हव्या होत्या. त्यानंतर पंधरावे षटक धोनीने मला टाकायला सांगितले. मी सचिनपासून चेंडू वळवून दूर नेऊ शकतो हे त्याला माहिती होतं आणि तसंच झालं. सचिन दुसºयाच चेंडूवर बाद झाला अन् सामना फिरला’’, असे जकातीने सांगितले. २०१० च्या हंगामाचा अंतिम सामना मुंबईत झाला होता. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १६८ धावा केल्या होत्या.