मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला धक्का
मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची केंद्रात बदली करण्यात आली आहे. भारत सरकारमध्ये त्यांना सचिव पदावर बढती मिळाली. इक्बालसिंह चहल हे मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेनेला धक्का ठरू शकतो. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी इक्बालसिंह चहल यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
इक्बालसिंह चहल यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे सचिव ही पदे सक्षमतेने सांभाळली आहेत. त्यानंतर त्यांनी मुंबई मनपात आयुक्त म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे.
केंद्राने त्यांना केंद्रीय गृह खात्याचे सहसचिव, केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागाचे सहसचिव, पंचायती राज विभागाचे सहसचिव अशा विविध पदांची जबाबदारी मार्च २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीत सोपवली होती. गृहनिर्माण आणि पुनर्वसन प्रकल्प, ग्रामविकास, दारिद्रय निर्मूलन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास या विभागांत भरीव योगदान दिलेल्या चहल यांनी जलसंपदा खात्यातही उत्कृष्ट कामगिरी केली.
प्रशासकीय सेवेतील
३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव
चहल यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेत महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला. भारतीय प्रशासकीय सेवेचा ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे.