23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाअखेरच्या षटकात मुंबई विजयी

अखेरच्या षटकात मुंबई विजयी

एकमत ऑनलाईन

आयपीएल २०२२ मधील मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर पार पडलेल्या ५१व्या सामन्यात मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला शेवटच्या षटकात ५ धावांनी आपल्या खिशात घातले. हा मुंबईचा हंगामातील दुसराच विजय. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला शेवटचे षटक टाकणारा डॅनियल सॅम्स. मुंबईच्या दुस-या विजयानंतर सोशल मीडियावर शेवटच्या षटकात ९ धावांचे संरक्षण करणा-या डॅनियल सॅम्सचे कौतुक केले जात आहे तर सध्या अव्वल क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिल्याबद्दल मुंबईवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या साखळी फेरीचे सामने आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहेत. साखळी फेरीतील अवघे काही सामने खेळले जायचे बाकी आहेत आणि या सामन्यांनंतरच प्लेऑफचे चित्र स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही दिग्गज संघ चालू हंगामात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. गुणतालिकेत टॉपवर असणा-या संघांना हरवून मुंबई आणि चेन्नईचे संघ स्पर्धेत उलटफेर करू शकतात. मुंबईचे कोलकाता, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईबरोबर सामने व्हायचे आहेत.

चेन्नईचे मुंबई, राजस्थान, दिल्ली व गुजरातबरोबर सामने व्हायचे आहेत त्यामुळे हे दोन्ही तळातील संघ मधल्या गटातील संघांना हरवून आयपीएलमध्ये अफलातून बदल करू शकतात. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी मुंबईने फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७७ धावा चोपल्या आणि गुजरातपुढे १७८ धावांचे आव्हान उभे केले, जे गुजरात संघाला पार करता आले नाही. त्यांना फक्त ५ बाद १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना खिशात घातला.

गुजरातकडून फलंदाजी करताना वृद्धिमान साहाने ४० चेंडूंत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या आणि शुभमन गिलने ३६ चेंडूंत २ षटकार आणि ६ चौकारांचा पाऊस पाडत ५२ धावा चोपल्या. या दोघा सलामीवीरांनी शानदार फटकेबाजी करत बारा षटकांत शतकी (१०६)धावांची सलामी दिली तसेच कर्णधार हार्दिक पांड्यालाच २४ धावा करता आल्या. यष्टिरक्षक ईशान किशनने हार्दिक पांड्या आणि राहुल तेवातियाला धावबाद करताना मोठी चपळाई दाखवली. मुंबईकडून गोलंदाजी करताना मुरुगन अश्विनने लक्षवेधी गोलंदाजी केली. त्याने गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. तसेच, कायरन पोलार्डनेही १ विकेट आपल्या नावावर केली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने चांगली कामगिरी केली. फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सचे सलामीवीर रोहित शर्मा (२८ चेंडंूत ४३ धावा) आणि ईशान किशन (२९ चेंडूंत ४५ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली आणि संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. असे असले तरी मध्यक्रमातील फलंदाज सलामीवीरांच्या तुलनेत अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाहीत. आशिष नेहरा त्यांच्या संघाचा सामना सुरू असताना खूप सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. त्याने गुजरातच्या गोलंदाजीवेळी संघातील खेळाडूंना महत्त्वाच्या विकेटसाठी डीआरएस घेऊ नका असे खुणावले आणि संघानेही तसेच केले. सोशल मीडियावर याच कारणास्तव वाद निर्माण झाला. नेटकरी आशिष नेहराच्या या कृत्याचा निषेध करत आहेत, कारण हे आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन आहे.

मागील सामन्यापासून धावांसाठी झगडणा-या किशनची बॅट या सामन्यात तळपली. मात्र, त्याला अर्धशतक करता आले नाही. त्याने २९ चेंडंूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्याच्यासोबतच टीम डेव्हिडने (४४,) कर्णधार रोहित शर्मा (४३) आणि तिलक वर्मा (२१) धावांचे योगदान दिले.

आसाममध्ये आढळणारा एक शिंगाडा गेंडा अभयारण्य असलेल्या काझीरंगाला पाच लाख रुपयांची मदत मिळाली. कॅरेबियन गोलंदाज अल्झारी जोसेफला डावाच्या दुस-या षटकातील शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने रोहित शर्माने मारलेला षटकार सीमारेषेपार टाटा मोटर्सची पंच गाडी उभी होती, त्या गाडीवर जाऊन पडला. यामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपयांची देणगी मिळाली.

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने ४ षटकांत फक्त २४ धावा देत २ विकेट्स आपल्या खात्यात जोडल्या. याव्यतिरिक्त अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन आणि प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. या पराभवानंतरही गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम असून मुंबईने विजय मिळवूनही ते गुणतालिकेत तळाशी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या