24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाआयपीएल २०२२ मधील मुंबईचे आव्हान संपुष्टात

आयपीएल २०२२ मधील मुंबईचे आव्हान संपुष्टात

एकमत ऑनलाईन

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील ३७व्या सामन्यात मुंबईचा पुन्हा एकदा सलग आठव्या सामन्यात रविवारी वानखेडेवर ३६ धावांनी पराभव झाला. लखनौच्या विजयाचे शिल्पकार कर्णधार के. एल. राहुल आणि कृणाल पांड्या ठरले. राहुलला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या लखनौने २० षटकांत ६ बाद १६८ धावांचा डोंगर उभा केला. लखनौच्या १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला ८ बाद १३२ धावाच करता आल्या.

प्रथम गोलंदाजी घेतल्याने मुंबईकर लखनौला थोडक्यात गुंडाळून आपल्या विजयाचा श्रीगणेशा करतील ही साधी-सोपी मुंबईकरांची अपेक्षाही स्वत:च्या मैदानावर मुंबईने फोल ठरवली. मुंबईकरांचे पराभवाचे अष्टक पूर्ण झाले आणि त्यांना अजूनही गुणांचा भोपळा फोडता आला नाही. आयपीएलच्या इतिहासात सलामीचे सलग आठ सामने पराभूत होणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ ठरला तर आयपीएल २०२२ मधील मुंबईचे आव्हान संपुष्टात आले

प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाकडून कर्णधार के. एल. राहुलने ६२ चेंडूंत ४ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १०३ धावा चोपत शानदार शतक साकारले. आयपीएलच्या इतिहासात वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावार सर्वाधिक ६ शतके आहेत. यादीत दुस-या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ५ शतके केली तर डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, जोस बटलर आणि आता त्यांच्या जोडीला राहुल या चौघांच्या नावावर प्रत्येकी ४ आयपीएल शतकांची नोंद आहे. के. एल. राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील दुसरे शतक ठोकले. मुंबईविरुद्धच १५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात राहुलने हंगामातील पहिले, तर सोमवारी दुसरे शतक ठोकले.

मनीष पांडेला २२ धावा करता आल्या. इतर फलंदाजांना धावा करणे जमले नाही मात्र, याचा फटका संघाला बसला नाही. कर्णधाराच्या अफलातून खेळीमुळे लखनौने सन्मानकारक धावसंख्या उभारली, जी पार करण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना रिले मेरेडिथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मुंबईकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने ३१ चेंडूंत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. तसेच, तिलक वर्माने ३८ आणि कायरन पोलार्डने १९ धावांचे योगदान दिले.

मुंबईचा १५.२५ कोटींचा खेळाडू ईशान किशन फक्त ८ धावा करून तंबूत परतला. ईशान ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले.
आठव्या शतकातील रवी बिष्णोईचा बाहेर जाणारा चेंडू ईशानच्या बॅटला लागल्यानंतर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या शूजवर पडला आणि स्लीपमध्ये उभा असलेल्या जेसन होल्डरच्या हातात गेला. चेंडूचा आणि जमिनीचा कुठेच संपर्क आला नसल्यामुळे ईशानला बाद करार दिले गेले. मात्र, ज्या पद्धतीने त्याने विकेट गमावली, ते पाहून पंचांसह सामना पाहणारा प्रत्येकजण हैराण झाला, हे नक्की. तसेच, ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविसही (३) खास कामगिरी करू शकला नाही. सूर्यकुमार यादवची (७) बॅट या सामन्यात तळपलीच नाही. यामुळे मुंबईची पुन्हा निराशा झाली. यावेळी लखनौकडून गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने ४ षटकांत १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मोहसिन खान, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले. या विजयासह लखनौने गुणतालिकेत चौथा क्रमांक गाठला. दुसरीकडे, मुंबई संघाची गाडी गुणतालिकेतील शेवटून पहिला क्रमांक सोडायचं नावच घेत नाही.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या