मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी, भाजपा नेत्या पंकजा मुंडे हे दोघे भाऊ-बहीण राजकारणाच्या रिंगणात सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. फटकेबाजी, टोलेबाजी करत दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र अनेकदा त्यांच्यातील प्रेमही दिसून येते. एकमेकांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करणे, कौटुंबिक संकटे, सोहळ्यात प्रेमाने धावून जाणे, अशा प्रसंगांतून भावा-बहिणीतलं प्रेम सतत दिसत असतं.
असाच एक प्रसंग एका सार्वजनिक कार्यक्रमात घडला आहे. सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पाडला. या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार, आदित्य ठाकरे, तात्याराव लहानेंसह पंकजा मुंडे आणि इतरही मान्यवर बसले होते. मागून धनंजय मुंडे येत होते. दरम्यान, पंकजा यांच्या जवळ येताच त्यांनी त्यांच्या डोक्यात प्रेमाने टोला मारला. त्यामुळे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या दोघांमधला हा खोडकर प्रेमाचा प्रसंग चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
या कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस कुणाकडेच नसतील असे शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे बाळासाहेब थोरात, जे नवीन दृष्टी देतील असे आदित्य ठाकरे, सोफिस्टिकेटेड लेन्सेस अमित देशमुख तसेच मुंडे-महाजन मैत्रीतून आणि आता राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या लेन्सेसमधून दिसणारे बंधू धनंजय मुंडे.