मुंबई : टीम इंडियाचा उपकर्णधार के. एल. राहुलने जर्मनीहून एक चांगली बातमी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रोइनच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी म्हणून राहुल जर्मनीला रवाना झाला होता. त्याच्या सोबत गर्लफ्रेंड अथिया शेट्टीसुद्धा आहे.
राहुलने आता सोशल मीडियावर त्याच्यावरील सर्जरीबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय चाहते नक्कीच यामुळे खुश होतील. के. एल. राहुलने आपल्या हस-या चेह-याचा एक फोटो शेयर केलाय. ‘‘मागचे काही महिने माझ्यासाठी कठीण होते. पण माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता माझी चांगली रिकव्हरी सुरू आहे. तुमचे मेसेज आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी तुमचा आभारी आहे’’ असे के. एल. राहुलने ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुलच्या पोस्टवर हार्दिकची कमेंट
राहुलच्या या पोस्टवर त्याचे मित्र आणि टीम इंडियातील खेळाडू हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहितची बायको रितिका सजदेह आणि अथियाचा भाऊ अहान शेट्टीने कमेंट करून लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल अजून काही काळ जर्मनीमध्ये राहणार आहे.