22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रसंकुचित विचारांच्या सत्ताधा-यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते; पवारांचा हल्लाबोल

संकुचित विचारांच्या सत्ताधा-यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते; पवारांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

 राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा शिबिरासाठी शिर्डीत हजेरी
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयातून थेट शिर्डी गाठत पक्षाच्या शिबिराला हजेरी लावली. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी केंद्र सरकार, भाजपवर हल्लाबोल केला. संकुचित विचाराच्या सत्ताधा-यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकते असे ते म्हणाले. पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला अहमदनगर जिल्ह्याचे स्वातंत्र्य, सहकार चळवळीतील योगदानावर भाष्य करत बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ दोन दिवसीय शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिबिरात पवारांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शिबिर संपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होतील. यावेळी त्यांना पूर्ण भाषण करता आले नाही. त्यामुळे त्यांचे उर्वरित भाषण राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवले.

दिलीप वळसे पाटील हे पवारांचे स्वीय सहाय्यक होते. स्वीय सहाय्यक पदापासून ते कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत जबाबदा-या त्यांनी पार पाडल्या आहेत.

या भाषणामध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये केंद्रात एक सत्ता आणि राज्यात दुसरी सत्ता असू शकते. केंद्र आणि राज्यातील नेतृत्वातील धोरणात अंतर असू शकते. केंद्रातील सत्तेने राज्यातील नेतृत्वाचा मान राखायला हवा. आज अनेक राज्यांमध्ये केंद्रातील विचाराशी सहमत नसलेली सरकारे आहेत. काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नसताना देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून अवैधानिकरीत्या राज्यातील सत्ता हस्तगत केली. अशी टीका शरद पवारांनी केंद्र सरकारवर केली.

पंजाब समस्या हाताळताना घेतलेल्या निर्णयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींच्या रूपाने देशाला तरुण नेता मिळाला. पण तमिळ प्रश्नांच्या मुद्यावर त्यांचीही हत्या झाली. त्यानंतर नरसिंह राव यांच्या काळात राजकीय स्थिरता आली तेव्हा माझ्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी होती. याच सुमारास अयोध्या मुद्यावर देशाची एकता धोक्यात घालण्याचे काम झाले. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण गढूळ झाले. भाजपची वाढ याच विचाराच्या आधारे झाली असल्याची टीका पवार यांनी केली.

भाजपकडे १९९८ मध्ये सत्ता आली. वाजपेयी यांच्या रूपाने सुसंस्कृत नेतृत्व देशाला मिळाले. त्यांनी भारतीय राज्यघटनेची चौकट ओलांडली नाही, असेही पवार म्हणाले. यूपीए सरकारच्या माध्यमातून देशाला लाभलेले तत्कालीन पंतप्रधानपदी आलेले डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आणखी स्थिरता देत, आर्थिक घडी बसवली. तेव्हा पवारांकडे कृषि खात्याची जबाबदारी होती. याच काळात कृषि विद्यापीठ, संशोधन संस्था, शेतकरी या सगळ्यांमुळे देशात अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली, देश स्वयंपूर्ण झाला. आघाडीचा निर्यातदार देश झाला, असेही पवार म्हणाले.

२०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपने केंद्रात सत्ता हस्तगत केली. भाजपच्या काळात देशात सध्या काय सुरू आहे याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आहे.   संसदीय लोकशाहीत केंद्र आणि राज्यात वेगळी सत्ता असू शकते. केंद्रातील सत्तेचा राज्याने मान राखला पाहिजे. केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगड, बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश गोवा, महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती पण केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमदार फोडून त्यांनी सत्ता मिळवली. सामान्य माणसाला ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयए आदी संस्था माहिती नव्हत्या. या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला असल्याची टीकाही त्यांनी केली. अनेक राज्यांच्या नेतृत्वावर हल्ला केला जातो. सत्ता बळकावणे हा भाजपचा अजेंडा असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेताना समान वागणूक देण्याची शपथ घेतली जाते. या पदावरील व्यक्तीकडे विकासाच्या दृष्टीने व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे, पण सध्याच्या नेतृत्वात तो दिसत नाही. पंतप्रधानांनी समाजातील सर्वच घटकांशी सामंजस्य राखून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याने महाराष्ट्रावरील होणारे आर्थिक दुष्परिणामही सांगितले.

 

शिबिर आटोपल्यावर रुग्णालयात
शरद पवार यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असताना त्यांनी आज राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरास उपस्थिती लावली. राष्ट्रवादीचे शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबिर सुरू झाले. आज या शिबिराचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आज शिबिर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.

अजित पवार, अमोल कोल्हे गैरहजर
मंथन शिबिराला शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हजर होते. मात्र विरोधी पक्ष नेते अजित पवार व खा.अमोल कोल्हे शिबिरात पोहोचले नसल्याने दोघेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती या विषयावर अमोल कोल्हे बोलणार होते. पण अमोल कोल्हे या कार्यक्रमाला गैरहजर आहेत. पक्षातील कार्यपद्धतीवर कोल्हे नाराज असल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या