30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्‍ट्रवादी- भाजपाचे सरकार स्थापन होणार होते. पण शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला...

राष्‍ट्रवादी- भाजपाचे सरकार स्थापन होणार होते. पण शरद पवारांनी ऐनवेळी निर्णय बदलला !

लेखिका प्रियम मोदी यांच्या नव्या पुस्‍तकात खळबळजनक दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२५ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी पूर्ण केली होती. दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक होऊन सर्व ठरलेही होते. मात्र राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलून शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला व अजित पवार यांनी २८ आमदारांसह भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, असा खळबळजनक दावा लेखिका प्रियम गांधी-मोदी यांच्या ‘पॉवर ट्रेडिंग’ या नव्या पुस्‍तकात केला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व कामगारमंत्री नवाब मलिक यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.

प्रियम गांधी यांनी आपल्‍या ‘पॉवर ट्रेडिंग’ या नव्या पुस्‍तकात राज्‍यात गेल्‍या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेल्या राजकीय नाट्य मांडले आहे. त्यावेळी पडद्यामागे झालेल्या घडामोडींबाबतची इनसाईड स्‍टोरी या पुस्तकात असून, त्‍यांनी या पुस्‍तकात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ८० तासांचे सरकार येण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपात संघर्ष झाल्यानंतर राष्‍ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. राष्‍ट्रवादीतल्‍याच एका माजी केंद्रिय मंत्र्यांच्या माध्यमातून भाजपासोबत बोलणीही सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांचीही राष्‍ट्रवादीच्या राज्यातील एका नेत्‍यासोबत चर्चा सुरू झाली होती. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क करण्यात आला.

शहा यांच्यासोबत फडणवीस,शरद पवार,प्रफुल पटेल यांची बैठकही झाली. परंतु नंतर शरद पवार यांनी आपला निर्णय बदलला, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांना महाराष्‍ट्राच्या पहिल्‍या महिला मुख्यमंत्री बनविण्याचे शरद पवारांचे स्‍वप्न आहे.महाविकास आघाडीचे सरकार टिकले तरच हे स्‍वप्न पूर्ण होउ शकते याची जाणीव शरद पवार यांना असल्‍यानेच त्यांनी ऐनवेळी आपला निर्णय बदलला व शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्‍याचा दावा प्रियम गांधी यांनी आपल्‍या पुस्‍तकात केला आहे.

२८ आमदार अजितदादांसोबत जाणार होते !
शिवसेनेसोबत जाण्यास अजित पवार इच्छुक नव्हते. त्यांनी फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे २८ आमदार आहेत व अपक्षांच्या मदतीने आपण बहुमत सिद्ध करू शकतो असे अजित पवार यांनी देवेन्द्र फडणवीस यांना सांगितले. त्या २८ आमदारांची नावं फडणवीस यांनी विचारली तेव्हा अजित पवार यांनी सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील टिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील यांच्यासह आणखी तेरा आमदार आपल्यासोबत असल्याचे सांगितले. या आमदारांना अन्य राज्यात हलवण्याच्या प्रस्ताव फडणवीस यांनी दिला होता. पण त्यांना इथेच ठेवून त्यांच्या मदतीने आणखी काही आमदार फोडण्याचा प्लॅन अजितदादांनी मांडला, असा खळबळजनक दावा प्रियम मोदी यांनी या पुस्तकात केला आहे.

निव्वळ कल्पनाविलास ! -राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसने या पुस्तकात केलेले दावे फेटाळून लावले आहेत. हा निव्वळ कल्पनाविलास असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सांगितले. तर औटघटकेचे सरकार स्थापन करून तोंडावर पडलेल्या माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली गेलेली इभ्रत परत मिळवण्यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचा टोला कामगार मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. अजितदादांनी परत येऊन आपली चूक दुरुस्त केली. थेंबाने गेलेली इभ्रत हौदाने परत येत नसते हे देवेन्द्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावे, असा चिमटाही त्यांनी काढला.

कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या सहा हजारांपुढे !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या