मुंबई : मागील काही महिन्यांपासून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्यावरून स्थानिकांचे मोठे आंदोलन सुरू होते. आता या आंदोलनाला यश मिळत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने सहमती दर्शवली असल्याची माहिती आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आली. विमानतळाच्या नामकरणावरून एकनाथ शिंदे यांनी भांडणे लावली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोठे आंदोलन नवी मुंबईत सुरू होते. सरकारकडून या विमानतळासाठी शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. आज नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या नावाला काहीच हरकत नसल्याचे म्हटले.
एकनाथ शिंदेवर निशाणा
एकनाथ शिंदे यांनी समाजात भांडण लावल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नामकरणाच्या मुद्यावर मंत्रिमंडळात योग्य माहिती प्रस्ताव दाखल केला नव्हता. आता मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.बा. पाटील यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखवला आहे.