नवी दिल्ली : काँग्रेस वर्किंग कमिटी या काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च समितीसाठी आता निवडणुका होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यांत काँग्रेसच्या महाअधिवेशनात या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी या दोन माजी अध्यक्षांचे काय होणार? वर्किंग कमिटीत त्यांना नेमके काय स्थान असणार याचीही चर्चा आहे.
अध्यक्षपदापाठोपाठ आता काँग्रेस वर्किंग कमिटीचीही निवडणूक होणार? काँग्रेसचे महाअधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेसच्या या नव्या रचनेसंदर्भात मोठे पाऊल पडण्याची शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी स्थान दिले जाण्याचीही शक्यता आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांचा असा समावेश होण्याची शक्यता आहे. वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.
कशी असते कमिटीची रचना?
वर्किंग कमिटीत एकूण २५ सदस्य असतात
– पक्षासाठी निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती
– एक अध्यक्ष, एक संसदीय पक्षाचा नेता आणि इतर २३ सदस्य अशी रचना
– यापैकी १२ सदस्य हे निवडणुकीद्वारे यावेत अशी अपेक्षा असते
– तर बाकीचे अध्यक्षांकडून नियुक्त होत असतात
अध्यक्षपदासाठी निवडणूक?
वर्किंग कमिटीसाठी निवडणूक व्हावी ही जी २३ गटाचीही मागणी होती. त्यामुळे आता अध्यक्षपदापाठोपाठ इथेही काँग्रेस निवडणुकीने नियुक्त्या करणार का हे पाहावे लागेल. २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये काँग्रेसचे हे महाअधिवेशन होण्याची शक्यता आहे. या वर्षात ज्या राज्यात निवडणुका आहेत. त्यापैकी एक छत्तीसगड. लोकसभा निवडणुकीला एक वर्षे उरले असताना काँग्रेस वर्किंग कमिटीतल्या या निवडणुका पक्षात नेमका काय बदल घडवतात हे ही पाहणे महत्वाचे असेल. भारत जोडो यात्रेचा समारोप येत्या ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. त्यानंतर आता काँग्रेसचं हे महाअधिवेशन पक्षाचा मोठा इव्हेंट असेल. त्यातून पक्षाला कशी आणि किती बळकटी येते हे पाहावे लागेल.