नाशिक : अतिवृष्टीमुळे विलंबाने लावलेला कांदा आता बाजारात येऊ लागला आहे. शेतक-यांना कांद्याला तीन हजारांहून अधिक दर अपेक्षित होता; पण नाशिक, सोलापूरसह सर्वच बाजार समित्यांमध्ये नवीन कांद्याचे दर गडगडले आहेत. दक्षिण भारतात अवकाळी पाऊस सुरू असल्याने कांद्याची मागणी घटली आहे. सध्या नवीन कांद्याला सर्वाधिक २३०० रुपयांपर्यंतच (प्रतिक्विंटल) दर मिळत आहे.
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती व नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये जातो. पण, सध्या दक्षिण भारतातील काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांद्याची मागणी घटली असल्याची माहिती सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा विभागप्रमुख विनोद पाटील यांनी दिली. पांढरा कांदाच सध्या बाजारात आलेला नाही.
सध्या बाजारात नवीन कांदा ३० टक्के तर जुना कांदा ७० टक्के आहे. पुणे, बीड, उस्मानाबाद, सोलापूर येथून नवीन कांदा विक्रीसाठी येत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे कांदा लागवड लांबली होती आणि त्यात जुना कांदा खराब झाल्याचा अंदाज होता. त्यामुळे नवीन कांदा डिसेंबरमध्ये बाजारात आल्यावर तीन हजारांहून अधिक दर मिळेल, असा शेतक-यांना विश्वास होता. पण, तीन हजारांपर्यंत असलेला दर आता अडीच हजारांपेक्षाही कमी झाल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणामुळे आवक कमी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता. १२) काही ठिकाणी थोडासा अवकाळी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे शेतक-यांनी कांदा काढणी लांबणीवर ढकलली आहे. सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता. १३) १८२ गाड्या कांद्याची आवक होती. त्यावेळी सर्वाधिक दर २३०० रुपये तर सरासरी दर १२०० रुपये होता. मागील १५ दिवसांत कांद्याचे दर कमी-कमी होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे काही दिवसांत आणखी दर वाढतील म्हणूनही शेतकरी कांदा उशिराने काढणार आहेत.