मुंबई : भारताने आज ऐतिहासिक कामगिरी केली. कारण आतापर्यंत भारताच्या कोणत्याही महिला खेळाडूला वर्ल्ड बॉक्सिंगच्या फायनलमध्ये आतापर्यंत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे या मानाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत पोहोचताना आता निखतने एक पदक निश्चित केले आहे.
निखतने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखदार कामगिरी केली. निखतने यावेळी ५२ किलो वजनी गटात ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडाचा ५-० असा पराभव केला आणि थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आतापर्यंत एकाही भारताच्या महिलेला स्थान पटकावता आले नव्हते. पण निखतने हा मान पटकावला आहे. अंतिम फेरीत निखतचा सामना आता थायलंडच्या जितमास जितपाँगबरोबर होणार आहे.
अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे निखतने आता रौप्यपदक निश्चित केले आहे. अंतिम फेरीत जरी निखतचा पराभव झाला तरी तिला रौप्यपदक मिळू शकते. पण निखतने जर अंतिम फेरीत विजय साकारला तर तिला सुवर्णपदक पटकावता येईल आणि या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरणार आहे. त्यामुळे आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निखत कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
भारताच्या दोन महिला
खेळाडूंचा झाला पराभव
भारताच्या मनिषा आणि परविन यांनीदेखील या स्पर्धेच्य उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मनिषा यावेळी ५७ किलो वनजी गटात खेळत होती, पण तिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. मनिषाला यावेळी इटलीच्या इरमा टेस्टाकडून ०-५ असा पराभव स्विकारावा लागला. मनिषाला यावेळी प्रतिकार करता आला नसल्याचेच पाहायला मिळाले. दुसरीकडे परविनने मात्र उपांत्य फेरीत चांगली लढत दिल्याचे पाहायला मिळाले. परविन ही ६३ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उतरली होती. पण परविनला यावेळी आयर्लंडच्या एमी ब्रॉडहर्स्टकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. पण निखतने मात्र उपांत्य फेरीत दमदार कामगिरी केली आणि विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.