बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या विरोधात मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. कर्नाटकाच्या विधिमंडळात महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला दिला.
महाराष्ट्रातील नेते बेळगाात येऊन वातावरण बिघडवत असल्याची टीकाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आता उरला नसून कर्नाटकातील सीमा भागात सगळे काही सुरळीत चालले आहे, असेही ते म्हणाले. राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. राज्याची पुनर्रचना होताना जनतेच्या भावना जाणून घेऊन राज्यांची निर्मिती करण्यात आली आहे. महाजन अहवाल हाच अंतिम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली, तो उद्देश बाजूला गेला आहे. समितीला कोणाचाही पाठिंबा उरलेला नाही, असे बोम्मई म्हणाले. कर्नाटकाची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नसल्याच्या भूमिकेचा बोम्मई यांनी ठराव मांडताना पुनरुच्चार केला.
महाराष्ट्रातील नेते मंडळी रंग बदलत असून येथील कायदा-सुव्यवस्था त्यांच्यामुळेच बिघडत असल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. तसेच महाराष्ट्राच्या नेत्याकडून वारंवार होणा-या वक्तव्यांचा निषेध करत संजय राऊत, जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू समर्थपणे मांडण्यास आपण तयार आहोत, कर्नाटकची बाजू भक्कम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रातील नेत्यांच्या निषेधाचा ठरावही मंजूर
या पुढील काळात कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी महाराष्ट्राला दिला. बोम्मईंनी कर्नाटकच्या सभागृहात महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचा निषेध करणारा निषेध ठराव मांडला आणि सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.