31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeराष्ट्रीयपीएफ खातेदारांना आता ८.१५ टक्के व्याज

पीएफ खातेदारांना आता ८.१५ टक्के व्याज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदाराला ८.१५ टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये २०२१-२२ साठी ईपीएफवरील व्याज ८.१ टक्के एवढ्या नीचांकी पातळीवर घसरले होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (सीबीटी) बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटी ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत.

ईपीएफ व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे ६ कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते. पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम ईपीएफओ अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणा-या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांसाठी ८.१५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज व्याज दर निश्चित करतात. अर्थ मंत्रालय हे निश्चित केलेले व्याज दर लागू करण्याबाबतचे आदेश जारी करतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची दोन दिवसीय बैठक २७ मार्चपासून सुरू झाली होती. आज त्यावर निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सरकारने पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर आणले होते, त्यामुळे हा ४० वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर राहिला. १९७७-७८ मध्ये ईपीएफओने ८ टक्के व्याजदर निश्चित केला होता. मात्र, तेव्हापासून व्याजदर सतत ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक राहिला आहे.

कर्मचा-यांच्या पगारातून कपात
एखाद्या कर्मचा-याच्या पगारातून १२ टक्के कपात केलेली रक्कम ईपीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचा-यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के रक्कम ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७ टक्के ईपीएफमध्ये जमा केली जाते.

घरबसल्या तपासता येणार रक्कम
तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अ‍ॅप, वेबसाईट किंवा तुमच्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. सध्याच्या काळात देशभरात सुमारे ६.५ कोटी कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या