अजित पवारांच्या हस्ते सोमवारी अर्पण सोहळा
पिंपरी : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ््यासाठी चांदीचे सिंहासन, अभिषेक पात्र, मखर व पुजा साहित्य असे एकूण २१ किलो चांदीचे साहित्य तयार करून घेण्यात आले असून शनिवारी (१८ जून) ते देहू संस्थांनकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
या सिंहासनाची शनिवारी मरवणूक काढण्यात येणार असून यानिमित्ताने इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (२० जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिंहासन अर्पण सोहळा होणार आहे. या उपक्रमाचे आयोजक व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, श्रीक्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, पुंडलिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, शेखर कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आदी उपस्थित होते.
सिंहासन व दिंडी मिरवणूक शनिवारी सकाळी ९ वाजता आकुर्डीतील विठ्ठल मंदिरापासून सुरू होणार आहे. पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर व श्री क्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सामुदायिक भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.