26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रआता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही

आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : हा ऐतिहासिक असा क्षण आहे. मुंबईची नव्याने जी लाईफलाईन तयार होत आहे त्या मेट्रो-३च्या पहिल्या ट्रेनचे टेस्टिंग केले आहे. यशस्वीरीत्या हे टेस्टिंग झाले आहे. आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

मेट्रो-३ च्या पहिल्या ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांनी सर्वांत आधी कोणते काम केले असेल तर ते म्हणजे या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर केले. त्यामुळे आता यामध्ये काहीही अडचणी राहिलेल्या नाहीत. काही आल्याच तर त्या दूर करण्याचा आमचा मानस राहील, असे फडणवीस म्हणाले.

कांजूरमार्गला स्टेशन केले असते तरी याठिकाणची जागा मोकळी होत होती, असे काही नाही. यासंबंधी मुंबईकरांच्या हिताचा निर्णय तुम्ही घेतला, त्याबद्दल अभिनंदन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यात राजकारण झाले. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढला, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यावेळी या ४० किलोमीटरवर ट्रेन धावेल त्यावेळी आत्मिक समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.
‘वेळेत निर्णय केला नसता तर..’
मुख्यमंत्र्यांनी वेळेत निर्णय केला नसता तर पुढच्या वर्षी काय, पुढचे चार वर्षे ट्रेन धावूच शकली नसती. वीस हजार कोटींची गुंतवणूक केली ती वाया गेली असती. त्यावर अजून १५-२० हजार कोटी रुपये खर्च करावे लागले असते. हा सर्व भार सामान्य मुंबईकरांवर आला असता. त्याच्या तिकिटातून तो वसूल झाला असता, असे फडणवीस म्हणाले.

‘हा विषय पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त’
मेट्रोच्या कारडेपोचा वाद हा पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त झाला. यासंदर्भात उच्च न्यायालयाने चांगला निर्णय घेऊन मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. तो निर्णय कोणी वाचला तर तो स्पष्ट आहे. पर्यावरणाचा विचार करूनच ही परवानगी देण्यात आली, असे ते म्हणाले. अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या