मुंबई : केंद्र सरकारने मागच्या दोन दिवसांपूर्वी गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन, मटारवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या या निर्णयानंतर अनेक स्तरांतून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता फक्त मरण स्वस्त आहे. त्याला कधी जीएसटी लावता? असा सवाल करत केंद्राला खोचक सवाल केला आहे.
पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेरचे, दवाखाना परवडत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके सा-यांनाच जीएसटी… आता स्वस्त आहे फक्त मरण. त्याला केव्हा लावता जीएसटी? अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या बैठकीत पॅकबंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांसारख्या उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला. तर गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर ५ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा बदल आजपासून प्रभावी झाला आहे.
कोणत्या वस्तू महागल्या?
१८ जुलैपासून टेट्रा पॅक दही, लस्सी आणि बटर मिल्कवर ५ टक्के दराने जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत यावर जीएसटी आकारला जात नव्हता.
५००० रुपयांपेक्षा जास्त भाडे (नॉन-आयसीयू)असलेल्या रुग्णालयातील रूम्सना आता ५ टक्के कर भरावा लागेल.
जीएसटी कॉन्सिलने दररोज १००० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल रूम्सवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे, जे अजूनही जीएसटीच्या कक्षेबाहेर होते.
एलईडी लाईट्स, एलईडी दिव्यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.
ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे असलेले चमचे, स्किमर आणि केक-सर्व्हर्स इत्यादींवर आता १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के दराने जीएसटी लागू होईल.