लंडन : जगभरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी त्यावर विविध उपाययोजना शोधल्या जात आहेत. जगातील सर्वच प्रगत देश आपापल्या पद्धथीने लस आणि इतर गोष्टींचा शोध घेत आहेत. यातच ब्रिटनमध्ये मात्र वेगळाच प्रयोग होतोय. तेथील मेडिकल स्निफर डॉग मनुष्यांमध्ये असलेल्या कोरोना व्हायरसचा तपास लावू शकणार आहेत. तसे प्रयोगच ब्रिटनमध्ये सुरु आहेत. ब्रिटनमध्ये या अनुषंगाने श्वानांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. या प्रयोगासाठी ब्रिटन सरकारने पाच कोटींचा निधी देखील राखीव ठेवला आहे.
चॅरिटी मेडिकल डिटेक्शन डॉग्सद्वारे श्वानांना कँसर, मलेरिया आणि पार्किसंस सारख्या रोगांचा गंध ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आता कोरोना व्हायरसने बाधित असलेल्या रुग्णांनाही ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या सोबत चॅरीटी मेडिकल डिटेक्शन आणि डरहम विद्यापीठ श्वानांना नवे प्रशिक्षण देणार आहे. लॅब्रोडर आणि कॉकर स्पेनियल प्रजातीच्या श्वानांना या प्रशिक्षणात सामील केले जाणार आहे. कोविड रुग्णाची लक्षणे दिसण्याआधीच मनुष्याचा वास घेऊन हे श्वान कोरोनाबाधिताला ओळखू शकतील का? याचा प्रयोग तपासाअंती करण्यात येईल.
Read More टोकाचं पाऊल : टीव्ही स्टार मनमीत ग्रेवालची गळफास घेऊन आत्महत्या
हे श्वान तासाला २५० रुग्णांची स्क्रिनिंग करतात. भविष्यात या श्वानांचा वापर कोरोनाबाधितांना ओळखण्यासाठी होऊ शकतो, या दिशेने ब्रिटनचे प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) संस्थेतील कर्मचाऱ्यांना सामील केले जाणार आहे. जे कोरोनाबाधित रुग्णांचे आणि संसर्ग नसलेल्या लोकांच्या गंधाचे नमुने एकत्र करणार आहेत. त्यानंतर सहा श्वानांना कोरोना व्हायरसची ओळख पटविण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल.
आपल्याला माहितच आहे की, श्वानांमध्ये गंध ओळखण्याची नैसर्गिक क्षमता असते. श्वानाच्या नासिकेची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा थोडी अधिक असून तो मानवापासून प्रशिक्षित होऊ शकतो. ब्रिटनच्या एका मंत्र्याने सांगितले की, “जर आमचा हा प्रयोग यशस्वी झाला तर आम्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यात गती प्राप्त करु शकतो. त्यामुळे व्हायरसचा अटकाव करण्यात आम्हाला आणखी मदत होईल.”