24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआता ई-कच-यातून धातू वेगळा काढणार!

आता ई-कच-यातून धातू वेगळा काढणार!

एकमत ऑनलाईन

नागपूर : इलेक्ट्रॉनिक कचरा अर्थात ई-वेस्ट हे आजच्या वैज्ञानिकांपुढील प्लास्टिक इतकेच मोठे आव्हान आहे. ई-वेस्टचे नेमके काय करावयाचे, याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा झडत आहेत. काही ठिकाणी या ई-कच-याचा पूनर्वापर केला जातो. मात्र, त्यासाठी त्यातील धातू काढावे लागतात. ही तशी किचकट आणि महागडी प्रक्रिया आहे. मात्र, ती कमी खर्चात करता येणे शक्य असून आता मध्य भारतातील पहिलेवहिले ई-कचरा व्यवस्थापन केंद्र राष्ट्रीय अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) उभारले जाणार आहे. तसा प्रस्ताव नीरीने आपली मुख्य संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) पाठविला आहे.

ई-कचरा हे भविष्यातील महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी हे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव नीरीने पाठविला आहे. सीएसआयआरची जमशेदपूर येथील राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा यावर काम करीत आहे. तेथे ई-कच-यातून धातू वेगळे करून त्याचा वापर करण्याचे केंद्र आहे. त्यामुळे नीरी आणि राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरात हे केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नीरीचे सुशांत वाठ यांनी दिली.

राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेने ई-कच-यातून धातू वेगळ्या करण्याच्या काही शास्त्रीय पद्धती विकसित केल्या आहेत. त्यांचा वापर येथे केला जाईल. तसेच अन्य काही शास्त्रीय पद्धती विकसित करता येतात का? यासाठीही प्रयत्न केले जातील. हे केंद्र मुळात मध्य भारतातील व्यावसायिकांसाठी प्रात्यक्षिक करून दाखविणारी प्रयोगशाळा ठरणार आहे. या केंद्रातील तंत्रज्ञानांचा वापर करून या व्यावसायिकांना मध्य भारतातील ई-कच-याचे योग्यरित्या व्यवस्थापन करावे, हा या केंद्रामागील मूळ उद्देश असल्याचे वाठ यांनी स्पष्ट केले.

पीएमओचा सल्ला
सीएसआयआरने ई-कच-याच्या पूनर्वापरावर काही तरी ठोस काम करावे, असा सल्ला पीएमओकडून (पंतप्रधान कार्यालय) आला होता. हा मुळात राष्ट्रीय धातुकर्म प्रयोगशाळेचा विषय असल्याने सुरुवातीला या प्रयोगशाळेने त्यावर काम सुरू केले. त्यात यश मिळत असल्याचे दिसून आला आहे.

सीएसआयआरकडे प्रस्ताव पाठविला
आता नीरीनेसुद्धा मध्य भारतासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी सीएसआयआरकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्याला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. अद्याप त्यासाठीच्या निधीबाबत अंतिम निर्णय व्हायचा. मात्र, आम्ही प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याची माहिती नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या