मुंबई : बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला आव्हान देत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्यासोबत ४१ आमदार असल्याचा दावा करीत उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याचे ट्विट त्यांनी केले. मात्र, बंडखोरांना प्रथम विधानसभेत हजेरी लावावी लागणार आहे. येथे आल्यानंतर शिवसेना आमदारांची भूमिका बदलेल, असे म्हणत शरद पवार यांनी बंडखोरांना कायदेशीर कचाट्यात पकडण्याची योजना आखली आहे, तर शिवसेनेनेही शिंदे गटासोबत गेलेल्या १५ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारे पत्र विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्याचे ठरविले आहे.
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली असतानाच इकडे शिवसेना नेत्यांना अजूनही हे आमदार परत येतील, अशी आशा आहे. खा. संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेळ आल्यास आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करू. शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांपैकी २१ आमदार अजूनही आमच्या संपर्कात आहेत, असे सांगतानाच गुवाहाटीत गेलेल्या सर्वच आमदारांनी परत यावे, शिवसेना आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असे म्हटले. राऊत यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला.
त्यातच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने या पार्श्वभूमीवर तातडीने बैठकाही बोलावल्या. मात्र, या बैठकीत विचार मंथन केल्यानंतर दोन्ही मित्र पक्षांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे विधान केले होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज आहेत. सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षच हायजॅक केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा शिंदे यांना पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.