कॉंग्रेसला धक्का, मनी लॉंड्रिंग प्रकरणात कारवाई
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यंग इंडियन लिमिटेडचे कार्यालय सील केले आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास यंत्रणेने ही कारवाई केली. यादरम्यान काँग्रेस मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थान १० जनपथच्या बाहेरही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यंग इंडिया लिमिटेडने नॅशनल हेराल्ड चालवणा-या असोसिएट जर्नल्स लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे.
विशेष म्हणजे काल ईडीने नॅशनल हेराल्ड कार्यालयासह १२ ठिकाणी छापे टाकले होते. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र चालवणारी कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या यंग इंडियनच्या अधिग्रहणाशी संबंधित नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाची ईडीने चौकशी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे की, यंग इंडियनने एजेएलची ८०० कोटींहून अधिक संपत्तीमध्ये फेरफार केला आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी, यंग इंडियनचे भागधारक यांची मालमत्ता मानली जावी, ज्यासाठी त्यांनी कर भरावा. सोनिया आणि राहुल गांधी यंग इंडियनचे प्रवर्तक आणि बहुसंख्य भागधारकांपैकी आहेत.
हे तर सुडाचे राजकारण
ईडीने दिल्लीतील यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर काँग्रेस आता अॅक्शनमध्ये आले असून, अजय माकन यांनी तिखट प्रतिक्रिया देत हे तर सुडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे. बेरोजगारी-महागाईच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधातील पक्षाचे आंदोलन दडपण्याचाही हा प्रयत्न आहे. मात्र, ५ ऑगस्ट रोजी महागाई, बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.