नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाने ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कोर्टाने चौटाला यांना ही शिक्षा सुनावली. त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासासह ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर कोर्टाने त्यांच्या चार मालमत्ता जस्त करण्याचेही आदेश दिले आहेत.
याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असताना चौटाला यांनी आपल्या जुन्या आजारपणाचे कारण देत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची कोर्टाला विनंती केली होती. दरम्यान, सीबीआयने युक्तीवाद करताना म्हटले होते की, भ्रष्टाचार समाजासाठी कॅन्सर समान आहे. भ्रष्टाचार प्रकरणी कोर्टाला अशी शिक्षा दिली पाहिजे जी समाजासाठी एक आदर्श ठरेल.
कोर्टाने चौटाला यांना तीन वर्षांहून अधिक कालावधीची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागू शकतो. पण ते जामिनासाठी दिल्ली हायकोर्टात अर्ज करु शकतात जिथे त्यांना दिलासाही मिळू शकतो.
सीबीआयकडून दाखल आरोपपत्रानुसार, चौटाला यांनी सन १९९३ आणि २००६ दरम्यान ६.०९ कोटी रुपयांची संपत्ती जमवली होती. ही संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त अवैध मार्गाने गोळा करण्यात आली होती. मे २०१९ मध्ये ईडीने ३.६ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली होती.
चौटाला यांना जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी घोटाळयात देखील दोषी ठरवण्यात आले होते. सन २००८ मध्ये चौटाला आणि ५३ इतर जणांवर १९९९ ते २००० पर्यंत हरयाणामध्ये ३,२०६ ज्युनिअर बेसिक प्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात आरोप झाले होते.
जानेवारी २०१३ मध्ये कोर्टाने ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे पुत्र अजय स्ािंह चौटाला यांना भ्रष्टाचार विरोधी कायद्यांतर्गत दहा वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. चौटाला यांच्यावर ३००० हून अधिक अपात्र शिक्षकांची बेकायदा पद्धतीने भरती केल्याप्रकरणी दोषी ठरली होती.