नवी दिल्ली : शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.
उद्धव ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमची बाजू न ऐकता आमच्या पक्षाचे चिन्ह गोठविण्यावर शिक्कामोर्तब केले. इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. प्राथमिक आक्षेपांवर सुनावणी घेता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या या टिप्पणीवर आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे. न्यायालय असे कसे म्हणू शकते, निवडणूक आयोगासमोरही आक्षेप घेण्यात आले.
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र सुप्रीम कोर्ट म्हणते की, दोन पक्ष आहेत, पण गट नाहीत, असेही सिब्बल यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला योग्य ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकेरी बेंचच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकेरी खंडपीठाने शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला योग्य ठरवले होते.