नाशिक : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी भेटण्याचे दिलेले आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वीकारले आहे. मी त्यांना निश्चित भेटेन. ते ‘मातोश्री’वरही भेटायला आले तरी चालेल, असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांची आज मनमाडला भेट होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आहेत. त्यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी ते बोलत होते. दुपारी ते मनमाड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात ते सुहास कांदे यांच्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन खात्यावर केलेल्या आरोपांवरही ते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांकडून सुहास कांदे यांचा निषेध केला जात आहे.
सुहास कांदे यांनी तुमच्या भेटीची वेळ मागितली आहे. तुम्ही त्यांना वेळ देणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर, चालेल. निश्चित भेटू. त्यांनी ‘मातोश्री’वर यावे. ‘मातोश्री’चे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलो. आता आपण मंदिरात आहोत. त्यामुळे येथे राजकारण नको, असे आदित्य ठाकरे म्हणाले.