कोलंबो : चहुबाजूंनी अडचणीत अडकलेल्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. देशात आता केवळ एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा शिल्लक आहे, अशी माहिती नवनिर्वाचित पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आज दिली.
आम्ही देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतोय. तोट्यात चाललेल्या श्रीलंका एअर लाइन्सचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात विक्रमसिंघे म्हणाले, कोलंबो बंदरात तेलाचे तीन टँकर उभे आहेत, परंतु आम्ही त्यांना डॉलरने पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेल मिळू शकत नाही. पुढे जनतेला आवाहन करताना ते म्हणाले, देशाची परिस्थिती बिकट आहे. येणारे काही महिने सर्वांसाठीच कठीण आहेत. प्रत्येकाने त्याग करण्याची आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
श्रीलंकेत दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. अलीकडेच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना हटवून त्यांच्या जागी रानिल विक्रमसिंघे यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान केले. आता मात्र नवे पंतप्रधान विक्रमसिंघे त्या आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत, जे श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीसाठी राष्ट्रपती गोटाबाया यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.