मुंबई : राज्यात मान्सून दाखल झाला मात्र, अद्याप पाऊसच नसल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी राज्यातील शेतकरी सज्ज झाले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ १ टक्काच पेरणी झाली आहे. १८ जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, ७५ मिमी पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. पावसाने ओढ दिल्याने बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून, पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांची चिंता वाढली आहे.
एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूनने महाराष्ट्र व्यापल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आला आहे, तरी राज्यभरात केवळ १ टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरिपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे.
गतवर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसाने दडी मारल्याने शेतक-यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृणधान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर तर कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे.
जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस
७ जूनपासून राज्यात मान्सून पावसाला सुरुवात होते आणि त्यामुळे जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने १७ जूनपर्यंत केवळ एक टक्का क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे.
पेरणीची घाई नको
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जरी पाऊस झाला असला तरीसुद्धा शेतक-यांनी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठेही पेरणी करू नये. पेरणीची घाई करू नये असे मत कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. जोपर्यंत शेतामध्ये तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करणे हे धोकादायक ठरू शकते.